मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय अजित पवारांचाच असून त्याबाबत त्यांच्याशी कोणीही बोलले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी जनतेत जाणार असून कार्यकर्त्यांंवर पूर्ण विश्वास असल्याचेही पवार म्हणाले. जे मंत्री झाले आहेत आणि त्यांच्यावर ईडीचे गुन्हे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, असेही शरद पवार म्हणाले.
बंडखोरी नवीन नाही
शरद पवार म्हणाले की, ‘अजित पवार यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. उद्या त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. काही लोकांनी पक्षावर दावा केला आहे. काही दिवसांतच सत्य बाहेर येईल. १९८० च्या निवडणुकीनंतरही अनेक आमदार मला सोडून गेले आणि माझ्यासोबत फक्त पाच आमदार राहिले. असे असतानाही मी पुन्हा पक्ष उभा केला आणि पक्ष सोडलेल्यांचा निवडणुकीत पराभव झाला. बंडखोरीचा हा प्रकार यापूर्वी पाहिला आहे. तेव्हा मी जे केले होते तेच मी पुन्हा करणार आहे. बंडखोरी माझ्यासाठी नवी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनता ठरवेल
शरद पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही माझी माणसे सोडत असल्याचे सांगितले जात होते पण मी पक्ष बांधला आणि २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त आमदार मिळवले. आम्ही अजित पवारांसोबत नाही. मी महाराष्ट्रात फिरून जनमत तयार करेन. राष्ट्रवादी कोणाची, हे जनता ठरवेल, असे त्यांनी ठासून सांगितले.
कारवाई करणार
पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे शरद पवार म्हणाले. मी अजून कोणाशीही बोललेलो नाही. अजित पवार यांच्याशीही बोललो नाही. आपण आजही पक्षाचे अध्यक्ष आहोत. बंडखोर नेत्यांबाबत शरद पवार म्हणाले की, त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे सरचिटणीस केले होते, मात्र त्यांनी फसवणूक केली, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
उद्या कराडला जाणार
महाराष्ट्रात फिरून जनतेचा पाठिंबा घेणार आहे. मी पक्ष काढला हे लोकांना माहीत आहे. मोदीजी जे करत आहेत ते लोकांना आवडत नाही. अजित पवारांना जनता उत्तर देईल. उद्याच मी कराडला जाणार आहे. तेथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहे. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे गुरु आहेत. आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्यापासूनच पक्षासाठी झंझावाती दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मोदींच्या आरोपातून मुक्तता
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे.
काही दिवसातच कळेल
आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.
माझा एककलमी कार्यक्रम
पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे.
आज पुन्हा ती स्थिती
चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत.
आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील.