मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. आता या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या शपथविधीवर प्रतिक्रिया ट्विटरवर दिली.
यावेळी ते म्हणाले की, ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
https://twitter.com/RajThackeray/status/1675444262220222466?s=20