मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात जात हा फॅक्टर प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे महत्त्वाचा मानला जातो, केवळ देशातीलच नव्हे तर राज्यातील राजकारणात याचा अनेक वेळा प्रत्यय आलेला आहे. सध्या देखील सत्तांतर नाट्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले असताना ऐनवेळी भाजपमधीलच मराठा लॉबी तथा काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याचे समजते. एकदा ब्राह्मण मुख्यमंत्री केल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा नको! अशी भूमिका घेतल्याने तसेच अमित शहा यांच्याशी फारसे शक्य नसल्याने फडणवीस यांचे नाव मागे पडले.
किंबहुना त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पदाची माळ फडणवीस यांना गळ्यात घालून घ्यावी लागेल असे म्हटले जाते, जातीय समीकरणांचे कारण देत भाजप पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झटका दिला. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फारसे सख्य नाही. फडणवीस यांचा शब्द महाराष्ट्रात अंतिम असतो, असे समीकरण रूढ झाले होते. पण पक्षनेतृत्वाने फडणवीस यांना धक्का दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन होत असताना भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी फारसे प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद हिरावले गेले. तसाच प्रकार पुन्हा याही वेळी दिसून आला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी बराच आटापिटा केला. शिंदे गट फोडण्याची तयारी करून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलणी देखील केली होती.
विशेष म्हणजे फडणवीस यांनी पडद्याआडून हालचाली करून व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राजकीय चाली केल्या. पण शहा यांना फडणवीस यांच्या सत्तास्थापनेच्या हालचाली फारशा पसंत नव्हत्या. तरीही फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा डावपेच टाकल्याने उध्दव ठाकरे सरकार कोसळले, त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील व शिंदेंना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांना दूरध्वनी करून शिंदे यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर करीत फडणवीस यांनी आपण सत्तेत सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामध्ये त्यांची नाराजी दिसून येत होती. परंतु नाराजी लपवीत पुन्हा वरिष्ठांचे आदेश आल्यावर त्यांनी राजभवनात अचानकपणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, यामध्ये भाजपमधील राज्यातील वरिष्ठ नेत्यांची खेळी यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच जातीय समीकरणे पुन्हा एकदा राज्यात चालतात, हे देखील उघड झाल्याचे जाणवत आहे.