मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा मोठा गट गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. यापैकी सुमारे १६ आमदारांना विधानसभा उपसभापतींनी नोटिसा बजावल्या असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. अशातच राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्लॅन बी समोर आला आहे.
एकनाथ शिंदे गटाने आपल्यासोबत ५० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. यापैकी शिवसेनेचे जवळपास ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यातील १६ आमदारांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाईची तयारी केली आहे. त्यांना उपसभापतींनी नोटीस पाठवली आहे. त्यास उत्तर देण्याची आज शेवटची तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर शिवसेना आणि शिंदे गटाची नजर असणार आहे. त्यावरच पुढील अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भाजपशासित राज्यातील गुवाहाटीमधील बंडखोर आमदारांची छावणी हे त्याचे प्रमुख कारण आहे. यासोबतच काल रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपचे आमदार आणि विधान परिषद सदस्य पोहोचण्याची प्रक्रिया सुरूच होती. बैठकांचा फेरा सुरूच आहे. भाजपच्या गोटात नक्की काय शिजतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की भाजपकडे प्लॅन-बी आहे, ज्याच्या मदतीने मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातही हा फॉर्म्युला राबविला जाण्याची दाट शक्यता आहे.
मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी ज्याप्रमाणे पक्ष आणि विधिमंडळाचा राजीनामा देऊन कमलनाथ यांचे सरकार पाडले होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदारही तेच करू शकतात. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात जाईल आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. भाजपला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी आहे. राज्यात पोटनिवडणूक होतील. या निवडणुका जिंकून भाजप अतिशय आक्रमक पद्धतीने पुढे सरकार स्थापन करेल.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार सातत्याने पक्षावर दावा करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारे शिवसैनिक असल्याचे ते सांगतात. शिवसेनेवर सत्ता मिळवण्याचा मार्ग बंडखोरांसाठी सोपा नाही. अशा स्थितीत हे आमदार विधानसभेत वेगळ्या गटबाजीचा दावा मांडू शकतात. त्यानंतर भाजपशी करार करून सरकार स्थापन करता येईल. त्यातही ते अपयशी ठरले तर त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पाहिल्यावर शिवसेनेत बंडखोर नेत्यांची साथ किती मजबूत आहे आणि उद्धव ठाकरेंना पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी किती प्रयत्न करावे लागतील, हे दिसून येते. शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षासाठी मुख्य चिंतेची बाब ही आहे की बहुतांश बंडखोर हे केवळ त्यांच्या मतदारसंघातच नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
सेनेचा एक नेता म्हणाला की, “यापैकी अनेक आमदारांनी किमान तीनदा निवडणुका जिंकल्या आहेत. स्थानिक कार्यकर्ते ठाकरे यांच्याशी संबंध बिघडले तरी त्यांची साथ सोडणार नाहीत. यापैकी अनेक बंडखोरांनी त्यांच्या भागात शिवसेना बळकट करण्यात मोठी भूमिका बजावली होती.” अशा मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे उद्धव यांच्याशी अतिशय कठीण काम असेल.”
Maharashtra Political crisis bjp strategy plan b formula