मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चांना आणखीनच जोर चढला आहे. काही दिवसांपूर्वी यांनी एक फोटो ट्विट करुन त्यास प्रारंभ केला होता. आज त्यांनी दुसरे ट्विट करुन या चर्चेला आणखीनच बळकटी दिली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केले आणि तब्बल ४० आमदार फोडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षावरील दावेदारीवरुन सर्वोच्च न्यायालयात सध्या रस्सीखेच सुरू आहे. न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आणि आता निकाल कुठल्याही क्षणी घोषित होण्याची चिन्हे आहेत. असे असताना अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दमानिया यांनी ८ एप्रिल रोजी एक ट्विट केले. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्विट केला. त्यात नमूद केले की किळसवाणे राजकारण… मी पुन्हा येईन…. त्यांच्या या ट्विटमुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरू असल्याच्या वार्ता रंगल्या. आणि आज पुन्हा दमानिया यांनी ट्विट करुन या चर्चांना आणखीनच जोर दिला आहे. दमानिया यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच… बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
Maharashtra Political Crisis Anjali Damania Tweet