मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणामध्ये दुसऱ्यांदा मोठा भूकंप आज झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ३० आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळेत राजभवनात आज शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज सकाळी देवगिरी या बंगल्यावर बैठक बोलावली होती. याच बैठकीत मोठा निर्णय झाला. त्यानुसार, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दुपारी अडीच वाजचा राजभवनामध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांना शपथ दिली.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा दर्शविली होती. विरोधी पक्ष नेते पद मला नको असल्याचे सांगितले. त्यानंतर आता अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा दिली. या निर्णयामुळे अजित पवार हे नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर आता पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे हे नेते झाले मंत्री
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्मरावबाबा आत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
अनिल पाटील
राजभवनातील शपथविधी सोहळ्याचा व्हिडिओ