मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना येत्या दिवाळीत मोठी खुशखबर मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक हे पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना आता दिवाळीत पदोन्नती मिळणार आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचं अतुलनीय योगदान कुणीही नाकारणार नाही. अशा पोलिस दलासाठी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं पोलिसांच्या पदोन्नतीबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे. राज्यातील हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली. यापैकी जवळपास ७०० ते ७५० पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे. महिन्याभरात संवर्ग मागवण्यात येणार असून दिवाळीत पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा मानस शिंदे-फडणवीस सरकारचा आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या पोलीस आस्थापना विभागाला सूचना करण्यात आली आहे.
नव्या सरकारने पोलीस विभागासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा धडाका लावला असून त्यामध्ये पदोन्नतीचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांना मुहूर्त निघाला असून त्यावरही निर्णय होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातेही असल्यामुळे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘मध्यस्थी’मार्फत नागपुरातून बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गणेशोत्सवानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यापूर्वीच या बदल्या व्हाव्यात, यासाठी राजकीय दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, पुण्यासह मराठवाडय़ातील ‘आयपीएस‘ दर्जाच्या अधिकाऱ्यांना विदर्भात ‘पोिस्टग’ देण्यासाठी हालचाली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच गृह मंत्रालयाने महिनाभरापूर्वी राज्यभरातील १०१७ साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी निवड यादी केली होती. गणेशोत्सवानंतर ४०२ साहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत साहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून संवर्ग मागवण्यात येणार आहेत. तर, दिवाळीत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे.
या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली.
याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Police Will Get Good News in Diwali
Promotion API PI PSI