मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने अखेर अध्यादेश काढला आहे. त्यामुळे पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या अध्यादेशानुसार, ११ हजार ४४३ पदे भरण्यात येणार आहेत.
राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. राज्यात लवकरच २ हजार पदांसाठी भरती केली जाईल, असे सरकारकडून सांगितले जात होते. प्रत्यक्षात अध्यादेश आणि प्रक्रियाबाबत कुठलेही पाऊल पडत नव्हते. अखेर आता राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण तब्बल ११ हजार ४४३ पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)द्वारे भरली जाणारी पदे वगळता अन्य ५० टक्के पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ११ हजार पद भरतीमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाचे पाऊल पुढे पडणार आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत, असे सरकारने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
Maharashtra Police Recruitment GR Published