सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू असून या भरतीमध्ये अनेक गैरप्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. धुळे, गडचिरोली पाठोपाठ सोलापूर व बीड मध्ये देखील असे प्रकार उघड झाल्याने मोठे खळबळ उडाली आहे.पोलिसांच्याकडे आढळलेल्या बनावट प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. सोलापूर पोलिसांच्या अटकेतील नव्याने भरती झालेले पोलिस शिपाई विकास मस्के व राहुल महिमकर या दोघांना हौसाजी देशमुख व पी. एल. देशमुख यांच्याकडून ती प्रमाणपत्रे मिळाली होती. आता पोलिसांनी देशमुख जोडीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. स्थानिक पोलिसांकडूनही त्यांच्याबद्दल माहिती घेण्यात आली असून सध्या दोघेही फरार आहेत.
कोठडीत दिली कबुली
गडचिरोली आणि पुणे शहर व ग्रामीणमध्येही असेच प्रकार समोर आल्यावर हौसाजीला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु, या बनावट प्रमाणपत्राच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हौसाजी नसून दुसराच कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण, त्या दोघांना बीडमध्ये नेऊन प्रमाणपत्र देण्यात आली होती. हौसाजी हा आटपाडी तालुक्यातील आहे. चार लाख रुपये दिल्यावर आम्हाला प्रमाणपत्र मिळाल्याची कबुली सोलापूर पोलिसांच्या कोठडीतील नव्याने भरती झालेले पोलिस शिपाई विकास मस्के व राहुल महिमकर यांनी दिल्याचे सांगितले जाते, कारण नोकरीच्या शोधातील तरुणांना शोधून त्यांना अंशकालीन व प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी आता समोर येण्याची शक्यता आहे.
म्हणून पोलिसांना आली शंका
गृह विभागाच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत विकास मस्के व राहुल महिमकर या दोघांनी बीड तहसील कार्यालयातील अंशकालीन असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे त्यांना पोलिस भरतीत संधी देखील मिळाली. अंतिम निवडीनंतर ते दोघेही धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले. मात्र त्याआधीच गडचिरोली व पुणे शहर-ग्रामीण पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्राच्या विषयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. आपल्याकडेही असाच गैरप्रकार होण्याची शक्यता आहे असा विचार करून सोलापूर शहर पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास केला. आणि खरोखरच तसा गैरप्रकार घडला होता. त्यापैकी दोघांनी बीड तहसील कार्यालयाचे खोटे प्रमाणपत्र दिलेल्यांची चौकशी झाली. त्यावेळी हे दोघे बनावट प्रमाणपत्राद्वारे भरती झाल्याची बाब उघड झाली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलीस हे जनतेचे रक्षक समजले जातात त्यामुळे त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा केले जाते परंतु पोलीस भरतीतच गैरप्रकार घडत असल्याने मोठे खळबळ उडाली आहे.
maharashtra police recruitment fake certificate racket solapur beed dhule
.