मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणपती विसर्जनावेळी काही पोलीस खाकी वर्दीत म्हणजे गणवेश घालून नाचत असल्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हिडीओची दखल घेत कोणत्याही पोलिसाने गणवेशात नाचू नये, अशा सूचना राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.
मुंबई शहर, पुणे आणि कोल्हापूर येथे मिरवणुकीत पोलीस नाचत असल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. तसेच काही ठिकाणी ढोल वाजवत होते. त्यांचे समाज माध्यमांवरील चित्रीकरण चर्चेचा विषय बनले होते. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक सरतासरता पोलिसही काही ठिकाणी बेधुंद नाचले. गाण्यांवर त्यांनी यथेच्छ ठेका धरला. या ठेक्याची किंवा पोलिसी नृत्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पोलिसांनी गणवेश घालून कर्तव्य निभावण्याऐवजी ठेका धरल्याने विविध स्तरांतून टीका करण्यात आली. वर्दीतील पोलिसांना हे शोभतं का, असा प्रश्न काहींनी विचारला. रेकॉर्डब्रेक वेळ चालेल्या या मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचेही रेकॉर्ड तुटले. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीत कर्तव्य पालन केले नसल्याची टीका करत सामान्य नागरिकांकडूनही करण्यात आली.
या सगळ्या प्रकरणाची दखल महासंचालक कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही पोलिसाने गणवेशात नाचू नये, अशा सूचना राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने दिल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देतानाही दिसून आले आहेत. पोलीस मुख्यालयाने दखल घेत पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Police Chief New Instructions Viral Video