सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय सेवेत असताना चांगले काम केले तर पदोन्नती मिळते. सध्या पोलीस खात्यात देखील अशाच प्रकारे पदोन्नती करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एका पोलिसाची पदोन्नती होऊन तो फौजदार झाला. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेकांनी पुष्पगुच्छही दिले. परंतु दुसऱ्या दिवशी लाच घेताना तो रंगेहात सापडला. त्यामुळे त्याच्या हातात बेड्या पडल्या. त्यामुळे या प्रकरणाची आता सर्व शहरभर उलट सुलट चर्चा सुरू आहे. दुसऱ्या एका प्रकरणात चार महिन्यापर्यंत फौजदार झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला देखील लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
२४ हजारांची लाच घेताना अटक
राज्य सरकारने राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करत त्यांना फौजदार पदाचा दर्जा देण्याचे आदेश काढले. याच यादीत सातारा पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी मच्छिंद्र बापुराव ससाणे (वय ५५, रा. गारखेडा) यांचा देखील समावेश होता. पण पदोन्नती झाल्याने दिवसभर पुष्पगुच्छ स्वीकारणाऱ्या ससाणेच्या हातात गुरुवारी बेड्या पडल्या. २४ हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आहे. पोलीस ठाण्यात ससाणेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र ससाणे याच्याकडे कौटुंबिक वादातुन दाखल असलेल्या एका प्रकरणात गुन्ह्याचा तपास होता. तर या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी ससाणे याने रुपयांची लाच मागितली होती. पण तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने थेट एसीबी कार्यालय गाठत तक्रार नोंदवली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची खात्री करत सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून पैसे घेताना मच्छिंद्र ससाणे यास एसबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या कारवाईतही
दुसऱ्या एका कारवाईत आणखी एक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे हा फौजदार देखील छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलीस दलातच कार्यरत आहे. सिडको पोलिस ठाण्यात फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या नितीन दशरथ मोरे (वय ४७) याच्यावर अर्ज निकाली काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. प्रापर्टीविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे नितीन मोरे याने पैशांची मागणी केली होती. शेवटी तडाजोडीत १२ हजार रुपयात व्यवहार ठरला. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावत लाच घेताना मोरे याला रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे मोरे हा देखील ४ महिन्यांपूर्वीच फौजदार झाला होता.
Maharashtra Police ACB Raid Bribe Corruption