मुंबई – राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. यासंदर्भात आज राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. राज्यात सध्या लागू करण्यात आलेले कोरोना निर्बंध आणखी कडक करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य टास्क फोर्सची आज बैठक झाली. दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत सद्यस्थिती विषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मुंबईतील रुग्णवाढ थेट दुप्पट होत आहे. राज्याचा आकडाही चिंता करायला लावणाराच आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसातच हजारो जण बाधित झाल्याचे दिसून येईल. यासाठीच गर्दी टाळणे आवश्यक आहे. जेणेकरुन संसर्ग फारसा पसरणार नाही. राज्यातील अनेक मान्यवर कोरोना बाधित झाले असून त्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले. ओमिक्रॉन हा विषाणू घातक नसला तरी त्याच्या संसर्गाचा वेग अफाट आहे. अवघ्या आठवडाभरातच राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. वेळीच योग्य ती खबरादारी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. लसीकरणावर अधिकाधिक भर देण्याचे बैठकीत निश्चित झाल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळेतच सुविधा उपलब्ध करुन देता येईल की शाळेतूनच विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रात आणायचे याविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.