मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला येत्या ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला राज ठाकरे हे अनुपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे राज यांनी कळविले होते. त्यामुळे मनसेच्यावतीने या बैठकीला नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे उपस्थित होते. या बैठकीत विविध बाजूंनी चर्चा करण्यात आली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, भोंगे सरसकटपणे उतरविणे किंवा त्याच्या विरोधात कारवाई करणे शक्य नाही. त्यानंतर मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, असे आमचे प्रामाणिक मत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे हीच राज ठाकरे आणि मनसेची इच्छा आहे. अद्यापही आम्ही ३ मे च्या दिलेल्या अल्टिमेटमबाबत ठाम आहोत. राज्य सरकारने भोंगे उतरवावेत. अन्यथा राज यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.