नाशिक – नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तयारी सुरू केली आहे. याचसंदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव तसेच नाशिक प्रभारी अमित ठाकरे यांच्या नाशिकवाऱ्या सुरू झाल्या आहेत. याच दौऱ्यांमध्ये ठाकरे यांनी मनसैनिकांना एक निर्देश दिले होते. ते म्हणजे, शाखाध्यक्षाचे घर तेथे मनसेचा ध्वज. या निर्देशाचे पालन करीत आता नाशिक शहरात जिथे जिथे शाखाध्यक्ष राहतात त्यांच्या घरावर मनसेचा ध्वज उभारण्याचे काम सुरू झाले आहे. नाशकातील मनसे पदाधिकारी शाखाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांना ध्वज सुपूर्द करीत आहेत. आगामी मनपा निवडणुकीसाठी शाखाध्यक्ष हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तसेच, संपूर्ण नाशिक शहरात आणि गल्ली, चौक व परिसरात मनसेचे अस्तित्व तसेच ध्वज यानिमित्ताने दिसावा, असा ठाकरे यांचा हेतू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शाखाध्यक्षाचे घर तेथे मनसे ध्वज ह्या उपक्रमाचा शुभारंभ नाशिक मध्ये करण्यात आला आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक शाखाध्यक्षांच्या घरी जाऊन पक्षाचा ध्वज लावण्यात येत आहे. #मनसे_घराघरांत pic.twitter.com/Fzy80dOo8N
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 11, 2021