मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बाल सुधारगृहांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराच्या माध्यमातून पर्यटन आणि कौशल्य विकासात एक लाख रोजगार निर्माण होतील. तसेच महिला व बालविकास विभागाच्या विकासाला चालना मिळेल, असे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मंत्रालयातील दालनात आज मूळ भारतीय वंशाचे कॅनडास्थित नागरिक इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्सच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला बाल विकास या विषयाच्या अनुषंगाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,कौशल्य विकास आयुक्त रामास्वामी एन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल,महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर, कॅनडा येथील इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारव्दाज, सदस्य राकेश जोशी, चिराग शहा, विरेंद्र राठी, राजेश शर्मा, दीपक शमाणी, अनिल शर्मा, चिन्मय चिक्रमने उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. सागरी गड-किल्ले येथील पर्यटन वाढीसाठी इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्स सहकार्य करणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. पर्यटन क्षेत्रात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासन महिला धोरण, कॅराव्हॅन धोरण आणत आहे. कौशल्य विकास विभागाअंतर्गत कॅनडा मध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण भारतात देण्यासाठी त्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल. या माध्यमातून पाच हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. सामाजिक क्षेत्रात देखील १०० च्या वर अंगणवाड्या दत्तक घेण्याचा मानस इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्सचा आहे त्यामुळे अंगणवाड्यांचा विकास होण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले.
राज्याच्या विकासासाठी सहकार्य करणार :- अरविंद भारद्वाज
इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. भारद्वाज म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन वाढावे यासाठी आमच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. वॉटर स्पोर्टस, सागरी गड किल्ले या पर्यटनात नक्कीच प्राधान्याने काम करण्यात येईल त्याच बरोबर कौशल्य विकास आणि महिला व बालविकास क्षेत्रातही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करण्यात येईल, असेही श्री. भारव्दाज यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Government MOU Indo Canadian Chamber Employment Generation
Anganwadi Tourism