‘कोकण, विदर्भ वगळता ३ दिवस मध्यम पावसाचीच शक्यता’
ऑगस्ट महिन्याचे १८ दिवस उलटून गेले तरी राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात तर उन्हाळ्याच्या तुलनेत दुप्पट पिण्याचे टँकर सुरू आहेत. धरणांमध्ये अद्यापही अत्यल्प साठा आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. राज्यात नजिकच्या काळात पावसाचा अंदाज नेमका कसा आहे हे आपण आता जाणून घेऊ…
सोमवार दि.२१ ऑगस्ट पासूनच अपेक्षित मान्सूनच्या श्रावणसरिंची शक्यता असतांना त्याअगोदरच म्हणजे आजपासूनच महाराष्ट्राच्या काही भागात खालील पद्धतीने पावसाची शक्यता जाणवते.
कोकणातील मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे दि..१८ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड ह्या ३ जिल्ह्यात दि.१८, १९ ऑगस्ट रोजी (२ दिवस)मुसळधार तर लातूर धाराशिव बीड जालना सं. नगर जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे दि.१८ ते २५ दरम्यान ढगाळ वातावरण राहून अगदीच केवळ मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर काहीसा ओसरला असुन धरण जलसंवर्धन क्षेत्रातून आवक मंदावली असुन धरण जलवाढ टक्केवारी मर्यादित झाली आहे. तरी देखील नाशिक व पुणे शहर पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता जाणवते.
मान्सूनचा आस हिमालय पायथ्याशीच स्थिरावल्यामुळे पावसाचा खण्ड कायम जाणवत आहे. १९७२ च्या नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खण्ड समजावा. २१ ऑगस्टनंतर बंगाल उपसागरात पुन्हा जर एखादी वातावरणीय प्रणालीची निर्मिती व तीचे मध्य भारतात (उत्तर छत्तीसगड दरम्यान) वायव्य दिशेने होणारे स्थलांतरण व परिणामकारक प्रभावच महाराष्ट्रात पुढे पाऊस होवु शकतो, असे वाटते. ऑगस्ट शेवटच्या आठवड्यातील परिस्थिती वातावरणीय ताज्या घडामोडीनुसार कळवले जाईल.
येणाऱ्या कालावधीसाठी सध्या हेच पावसासंबंधीचे वास्तव जाणवत आहे.
सध्या इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Monsoon Rainfall Forecast Weather Climate