मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाचे कामकाज अवघे ५ दिवसच चालणार आहे. राज्यात नियुक्त झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे अधिवेशन गाजणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याची चूणूक मंगळवारीच दिसली आहे.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबतअंतिम निर्णय घेण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
१७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली होती.
अधिवेशनात प्रस्तावित विधेयके व अध्यादेश असे
सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश :- ६
१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२.
प्रस्तावित विधेयके :- ९
१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.
२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२.
३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२.
४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२.
५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.
६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.
७) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२.
८) महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.
९) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकार व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ (बाजार समित्यांमध्ये
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्यासाठी समितीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी
बाजार समितीवर त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्याबाबतची तरतूद करणेबाबत).
Maharashtra Monsoon Assembly Session from Today