मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार बाळू धानोरकर (वय ४८) यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. २०१९मध्ये मोदी लाट असतानाही आणि शेवटच्या क्षणी तिकीट मिळूनही ते काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले. २०१९ पासून आतापर्यंत राज्यातील ६ आमदार आणि ३ खासदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
२०१९ मध्ये सर्वप्रथम लोकसभा निवडणूक झाली. त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली. २०१९पासून आतापर्यंत एकूण ९ लोकप्रतिनिधींचे निधन झाले आहे. अकाली झालेल्या या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यातील काही लोकप्रतिनिधी हे त्यांच्या भागातील जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तीच होते. त्यांच्या जाण्याने राजकारणाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या आमदारांनी घेतला निरोप
१. भारत भालके (वय ६०) – कोरोना काळात भालके यांचा मृत्यू झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर येथील आमदार होते.
२. रावसाहेब अंतापूरकर (वय ६३) – यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते काँग्रेस पक्षाचे नांदेडमधील आमदार होते.
३. चंद्रकांत जाधव (वय ५७) – कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार होते. त्यांचेही कोरोनामुळे निधन झाले.
४. रमेश लटके (वय ५२) – ठाकरे गटाचे हे आमदार होते. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करीत होते. हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.
५. मुक्ता टिळक (वय ५७) – या भारतीय जनता पक्षाच्या आमदार होत्या. पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या प्रतिनिधीत्व करीत होत्या. कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.
६. लक्ष्मण जगताप (वय ६०) – भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड मतदारसंघाचे हे आमदार होते. कर्करोगाशी त्यांनी मोठी झुंज दिली. पण ती अपयशी ठरली.
हे खासदार निवर्तले
१. राजीव सातव (वय ४७) – काँग्रेस पक्षाचे खासदार आणि गांधी कुटुंबियांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. हिंगोली मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. नंतर त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. कोरोनाशी त्यांनी झुंज दिली पण ती अपयशी ठरली.
२. गिरीश बापट (वय ७३) – पुणे लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते. भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यात पक्षाचे मोठे काम केले. अनेक दिवस ते आजारी होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
३. सुरेश उर्फ बाळू धानोरकर (वय ४७) – महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते. धानोरकर यांना किडनीशी संबंधित आजार झाला होता. त्यावर उपचार सुरू होते. परंतु, तीन दिवसांपूर्वी त्यांना नागपूरहून एअर एम्बुलन्सने तातडीने दिल्लीला हलविण्यात आले. मात्र, त्यांचे आज निधन झाले.
Maharashtra MLA MP Death since 2019