मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
‘मिशन थायरॉईड’ या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व बऱ्याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2 हजार महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानदेखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे.
अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुद्धी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.
Maharashtra Medical Colleges and Hospitals New Campaign