मुंबई – राज्यातील लॉकडाऊनची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होण्याची दाट चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठका घेत आहेत. उद्या गुढीपाडवा असून परवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. सर्वसाधारणपणे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. याच बैठकीत लॉकडाऊनच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, त्यांना आर्थिक मदत देण्यासह अन्य महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाण्याचे खात्रीलायक माहिती आहे. ही बैठक आटोपताच मुख्यमंत्री राज्याला संबोधित करतील आणि लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच लागण्याची चिन्हे आहेत. तसेच, राज्यात किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणजे, ३० एप्रिल पर्यंत राज्यात ल़कडाऊनद्वारे कोरोनाचा संसर्ग तसेच साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.