विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात लागू असलेले निर्बंध येत्या १ जून पर्यंत आहेत. हे निर्बंध हटवायचे की कायम ठेवायचे यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे बैठकीनंतर आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध मंत्र्यांनी त्यांची मते मांडली. काही मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थिती विषद केली. लॉकडाऊन पूर्णपणे उठवू नये, असे छाम मत जवळपास सर्वच मंत्र्यांनी मांडले आहे.
कोरोना प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी लॉकडाऊन हटविताच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, संभाव्य तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा गंभीर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्याने राज्यातील निर्बंध हटविण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाले आहे.
पहिल्या टप्प्यात कुठल्या सेवांना आणि किती मुभा द्यायची याचा विचार राज्य टास्क फोर्सच्या सल्ल्याने घेतला जाणार आहे. सध्या खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती आहे. १ जूननंतर ही उपस्थिती ५० टक्के होण्याची शक्यता आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. ज्या तालुके आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे तेथे लॉकडाऊन कायम ठेवायचा की तेथे आणखी निर्बंध लादायचे याबाबतचा निर्णय त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये बाधितांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) अधिक आहे. याठिकाणी सध्याचा लॉकडाऊन कायम ठेऊन काही प्रमाणात शिथीलता देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेला मुख्यमंत्री त्यांचा निर्णय जाहिर करण्याची शक्यता आहे.
रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 27, 2021