मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे इच्छुकांनो आणि कार्याकर्त्यांनो तुम्हाला आता कामाला लागावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात रखडलेल्या २३ महानगरपालिका २०७ नगरपालिका व २५ जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायत व पंचायत समिती व ग्रामपंचातीच्या रखडलेल्या निवडणुका सुध्दा होणार आहे. त्यामुळे राज्यभरात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडू शकतो.
राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात सप्टेंबर – ऑक्टोबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेल्या या राजपत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यात १ जुलै २०२३ दिवशी अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुका म्हणजे विधानसभेची तालीमच असणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यातील मोठ्या महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये किसमे कितना है दम हे मात्र कळणार आहे.