मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. यापूर्वीच एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यात काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची निवड झाली आहे. आता राज्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा कोल्हापूर येथील जागाही बिनविरोध झाली आहे. येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि राज्य मंत्री सतेज पाटील यांची निवड झाली आहे. अन्य चार जागांवरही बोलणी सुरू असून त्या सुद्धा बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डॉ.प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या डॉ. प्रज्ञा या पत्नी आहेत. त्यांची विधान परिषदेवर निवड होताच अन्य जागांसाठीही बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत. त्यात आता कोल्हापुरातील जागेवर यश आले आहे. याठिकाणी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने अमल महाडिक यांनी उमेदवारी दिली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे. बिनविरोध निवडणुकीबाबत त्यात निर्णय झाला आहे. त्यामुळेच महाडिक यांना फोन करण्यात आला. त्यानंतर महाडिक यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. परिणामी, सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.