इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला आहे. त्यातच हा प्रश्न मिटण्याऐवजी आणखीनच गंभीर बनत चालला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे दोन मंत्री कर्नाटक जाणार होते, परंतु कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या महाराष्ट्रातून कोणीही मंत्री कर्नाटकात येऊ नये, असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याने नेमके त्यांचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी काय चर्चा झाली. हे अद्याप समजलेले नाही. दरम्यान या दोन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द झाल्याचे समजते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगला तापला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सीमा भागातील गावांना पाणी सोडल्याने सरकारच्या गावकऱ्यांची समजूत काढणे महाराष्ट्र सरकारसाठी अवघड झाल्याचे दिसते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. मात्र दोन मंत्री तेथे जाणार असताना हा दौरा आता रद्द झाल्याच्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, सीमा प्रश्नात काय ठोस होईल असे तर काही वाटत नाही. कारण दोन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. आपले मंत्री दोन तारखा देऊन दौरा रद्द करता असून हे डरपोक सरकार आहे. तसेच ते सीमा भागातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाहीत, असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तर दुसरीकडे या वाढत्या महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय, सीमावाद चिघळू नये यासाठी मंत्र्यांना तूर्तास दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आणखी मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असे आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, दि. ६ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. मात्र या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, या प्रश्री समन्वयातून तोडगा काढायचा आहे. हे प्रकरण चिघळू न देता, केंद्राने याच मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आततायीपणा करुन, कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचे नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या संदर्भात कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. सगळा जो काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयच या संदर्भात घेणार आहे. असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1599658682702495744?s=20&t=aDEZx8QtqAfJG1_kCpVtQA
Maharashtra Karnataka Border Issue Minister Tour Cancelled