मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर 2022) नमूद केले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे.
‘डुइंग बिझनेस इन इंडिया: द यूके पर्स्पेक्टिव्ह (2022 एडिशन)’ हा यूके इंडिया बिझनेस कौन्सिलचा आठवा वार्षिक अहवाल आहे, ज्यामध्ये भारतातील व्यावसायिक वातावरणाविषयी यूके व्यवसाय आणि उच्च शिक्षण संस्थांची मते आणि अनुभव मांडले. या अहवालात “व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक पोषक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वोच्च गुणांकन केलेले राज्य होते, त्यानंतर गुजरात, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश” यांचा क्रमांक लागतो. पुढे, अहवालात 5 पैकी 3.33 गुणांसह भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर गुजरात, चंडीगड, हरियाणा (आणि हिमाचल प्रदेश) यांचा क्रमांक लागतो.
यूके इंडिया बिझनेस कौन्सिल (UKIBC) ही एक सदस्यत्व-आधारित, ना-नफा संस्था आहे ज्याची स्थापना 2007 मध्ये युनायटेड किंगडम आणि भारत यांच्यातील व्यापार आणि व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ही संस्था दोन्ही देशांतील व्यवसायांसोबत, तसेच यूके आणि भारत सरकारांसोबत काम करते. यूके इंडिया बिझनेस कौन्सिल यूके आणि भारतात यशस्वी होण्यासाठी आवश्यक (insight) अंतर्दृष्टी, नेटवर्क, धोरण निश्चिती, सेवा आणि सुविधांसह व्यवसायांना समर्थन देते.
हा अहवाल ब्रिटनच्या व्यवसायांना भारतात प्रवेश करताना आणि काम करताना येणाऱ्या आव्हानांची चर्चा करतो, त्यांच्या सुधारणांचे प्राधान्यक्रम आणि भारताच्या व्यावसायिक वातावरणातील विविध पैलूंचे मानांकनास विचारात घेतले जाते. यूके व्यवसाय आणि उच्च शिक्षण संस्थांच्या विस्तृत सर्वेक्षणातून या अहवालाचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. हे सर्वेक्षण ऑगस्ट आणि सप्टेंबर 2022 मध्ये एकूण 600 हून अधिक प्रतिसादकर्त्यांनी पूर्ण केले आणि असे आढळून आले की भारतात व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्वोत्तम आहे.
या सर्वेक्षणाच्या निकालांवरून गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मागे टाकले आहे. व्यवसायाच्या आकारानुसार आणि क्षेत्रानुसार विविध कंपन्यांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश होता, यात प्रगत अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांपासून ते डिजिटल आणि डेटा सेवा, व्यावसायिक सेवा, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान आणि इतर याचा समावेश आहे.
यूके इंडिया बिझनेस कौन्सिल (UKIBC) ने भारतात उद्योग कार्यरत राहण्यासाठी आवश्यक वातावरणाची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षणाने विविध कालावधीत गोळा केलेल्या विशाल डेटाचे विश्लेषण यूके व्यवसायाच्या दृष्टीकोनातून केले आहे. हे भारत सरकार आणि राज्य सरकारांसोबत भागीदारी पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. उद्योग जगताकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार महाराष्ट्र विजेता असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यात विविध विभागांनी एकत्रितपणे केलेल्या सहकार्याचे हे उत्तम उदाहरण आहे. विविध उद्योगांना परवानग्या देण्यासाठी शासन लवकरच एक खिडकी व्यवस्थेसाठी कायदा तयार करणार असल्याची माहिती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे.
Maharashtra Industrial Development First in Country