मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही विद्यापीठांमध्ये सेमिस्टर म्हणजे सत्र पद्धतीने नुसार परीक्षा घेण्यात येते, त्याचप्रमाणे आता बारावीची परीक्षा देखील दोन सत्रात घेण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. आतापर्यंत बारावीची परीक्षा म्हटले की मार्च महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. त्यामुळे इयत्ता अकरावी पासूनच विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या तयारीला लागत होते. अकरावीची परीक्षा होत नाही तोच वर्षभर अभ्यास करावा लागत होता. त्यानंतर मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा होत असेल परंतु आता दोन सत्रात ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येते.
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले होते.. दरम्यान, आता वर्षातून दोन वेळा बोर्डाची परिक्षा घेण्या संदर्भात विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीने वर्षातून बारावी बोर्ड परीक्षा दोन वेळेस घेतली जाईल, विशेष म्हणजे १२वी ला बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता विविध विषय निवडून बारावी बोर्ड परीक्षा देता येईल.
यापुर्वी करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ ची परीक्षा त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली होती. मार्च महिन्यात राज्यात बारावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली होती.
नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय पातळीवर याबाबत चर्चा करून निर्णय निश्चित करण्यात येणार आहे.
बारावी बोर्ड परीक्षा एकाच वर्षी दोनदा सेमिस्टर पद्धतीनं घेतली जावी, तसेच बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्याला आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अभ्यासक्रमातील विषयांची मर्यादा नसावी, विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना १६ विविध अभ्यासक्रमांची कोर्स उपलब्ध ठेवावेत त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, असे सांगण्यात येते.
महत्वाची बाब म्हणजे याआधी कोरोना काळात मागील शैक्षणिक वर्षात अशाप्रकारे बोर्डाच्या वर्षातून दोन वेळेस सेमिस्टर पद्धतीनं परीक्षा घेण्याचा प्रयोग सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाकडून करण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारे दोन सत्रात परीक्षा घ्यायची असेल, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून विचार विनिमयानेच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी बारावी बोर्ड परीक्षा आता एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा घेण्याचा विचार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क नव्याने तयार करणाऱ्या देशातील तज्ज्ञ मंडळींनी मांडला असल्याचे समजते.
Maharashtra HSC Board Exam Pattern Change