नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निसर्गाचा समतोल राखला तरच निरामय आरोग्य लाभेल असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत विद्यापीठ परिसरात मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते वृक्षरोपण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. तद्नंतर संलग्नित महाविद्यालयातील 750 विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर, डॉ. सुबोध मुळगुंद, डॉ. सुशीलकुमार ओझा, डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, पर्यावरण संतुलनासाठी सर्वांनी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आरोग्य व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पर्यावरण व वृक्षसंवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने महाविद्यालय परिसरात राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयात सुमारे 75000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वाढते प्रदुषण, तापमान वाढ, पाणी टंचाई आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्वानी वृक्षरोपणाचे उपक्रम आपल्या परिसरात राबविणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांनी परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करावे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांना जिओटॅग करण्यात येणार असून त्या वृक्षाचे औषधी उपयोग, छायाचित्र व माहिती स्मार्ट मोबाईलने क्युआरकोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध होईल असे त्यांनी संागितले.
विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड करतांना विशिष्ट पध्दतीने वर्गीकरण करण्यात आले असून यामध्ये रुची उद्यान, गंध उद्यान, श्रवण उद्यान, दृष्टी उद्यान व स्पर्श उद्यान असे भाग तयार करण्यात आले आहेत. विद्यापीठातील रुची उद्यानात फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, अॅपल बोर, चोरोळी, सिताफळ, पेरु, अंजीर , आंबा, नारळ, चिकु , गोरख चिंच, फणस, सुपारी, मरुड शेंग, रामफळ, निंबु, संत्र्ाा, डॅªगन फुड, चेरी, मोसंबी, जांभुळ, चिंच, डाळींब आदी वृक्षांचा समावेश आहे तर श्रवण उद्यानात गोल्डन बांम्बु, मारवेल बांम्बु, पम्पस गा्रस, सादडा वृक्षांचा समावेश आहे. तसेच गंध उद्यानात कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, अॅलीसम, एक्सझोरा, धायटी, पारिजातक, अंकोल, मुचकुंद, टीकोमा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, प्लुमेरिया आल्बा, हिबिक्सस, गावराण गुलाब, अनंता, जाई, जुई, रानजुई, कुंदा, सोनचाफा, प्लुमेरिया रुबरा, सितारंजन, लेमणग्रास, मारवा या वृक्षांचा समावेश आहे. दृष्टी उद्यानात रोईओ, टाकला, तरवड, कन्हेर, फाईक्स, जास्वंद, हमेलिया पॅटर्नस्, क्रॉटन, टगर, शंकासुर, मालफिगीया या वृक्षांचा समावेश आहे.
विद्यापीठात आयोजित वृक्षरोपणासाठी नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, गोखले नर्सिंग कॉलेज, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ नर्सिंग, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, भोसला नर्सिंग कॉलेज, आयुर्वेद सेवा संघ संचलित आयुर्वेद महाविद्यालय, धन्वंतरी होमिओपॅथी कॉलेज, सप्तऋंृगी आयुर्वेद महाविद्यालय, साई केअर कॉलेज ऑफ नर्सिंग, के.बी.एच. दंत महाविद्यालय आदी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व सुमारे 750 विद्यार्थी उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी कोव्हिड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.