इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘जी जात नाही ती जात’, असं अनेकदा गमतीत म्हटलं जातं. आपण कितीही पुढारलेले असलो तरी अजूनही आपल्यावर जात, धर्म याचा पगडा भारी असल्याचे दिसते आहे. याचा अनुभव नुकताच एका प्रथितयश कलाकाराला आला आहे. त्यानेही हा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्याचा अनुभव काय?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. दर्जेदार विषय, विनोदाची आतिषबाजी आणि हास्याचा स्फोट यामुळे या कार्यक्रमाने वेगळीच ऊंची गाठली आहे. यातील कलाकार देखील प्रेक्षकांचे अत्यंत लाडके आहेत. यातीलच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्विक प्रताप. पृथ्विक साध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. पण, एका मुलाखतीत त्याने एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. पृथ्वीक प्रताप हा कधीच आपल्या नावापुढे आडनाव लावत नाही. त्याबद्दल त्याला एका मुलाखतीत विचारलं तेव्हा तो म्हणाला की, आडनावावरून जात कळते, आणि मला आजवर पाच मुलींनी जातीमुळे नाकारलं आहे.
जातीवरूनच केले जाते ‘जज’
आपण जेव्हा आडनावं सांगतो, तेव्हा तात्काळ आपण कोणत्या जातीचे आहोत, याचे अंदाज बांधले जातात. मी लहानपणापासून हे पाहिलं आहे. माझ्या जवळचे अनेक मित्र देखील यातून गेले आहेत, असे पृथ्वीक सांगतात. ‘आडनावामुळे एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटतो असं मुळीच नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा आदर असतोच. पण आडनाव काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट करता.’ आपल्याला फक्त नावावरूनच का ओळखले जाऊ नये. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता, अशी खंतही पृथ्वीक व्यक्त करतो.
जातीवरून दिला मला नकार
मी लग्न जुळवायला गेलो तर तिघींनी तर मला जातीवरून रिजेक्ट केलं. चौथी माझी गर्लफ्रेंड होती, तिनेही माझ्या कामावर आणि पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिचे आईबाबा आजही माझ्याशी तेवढ्याच आपुलकीने बोलतात, मला त्यांच्या घरी बोलावतात, खाऊ घालतात. ‘नकार द्यायचा म्हणून ती वेगवेगळी कारणं शोधत होती. पण मग शेवटी तिने आपली जात एक नाही म्हणून नकार दिला. खरं तर अगोदर याच कारणामुळे मला तिघींनी नकार दिला होता हिने केवळ डायरेक्टर नकार न देता गोष्ट फिरवण्याचा प्रयत्न केला.’
प्रत्येक जातीला सन्मान मिळावा
‘प्रत्येक जातीला त्याचा सन्मान मिळायला हवा, त्यावरून त्याचं अस्तीव ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. प्रत्येक माणसाला फक्त त्याच्या नावावरून माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Maharashtra Hasya Jatra Fame Actor prithvik pratap on Caste