मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाने अर्धवेळ पदावरील ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याची बाब अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नवीन आकृतीबंधानुसार अर्धवेळ ग्रंथपाल पद हे मृत संवर्ग करण्यात आले असून या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मुलाखती यशदा, पुणे येथे दिनांक १० ते १३ एप्रिल २०२३ या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सदर परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी २०३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील असे आयोगाने कळविले आहे.
Maharashtra Half Time 1276 Librarian Gift