मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि राज्यात कलम १४४ लागू करुनही बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने राज्य सरकार आता निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील सर्व किराणा दुकाने केवळ चार तासच उघडी ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच ती सुरू राहणार आहेत. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या काही दिवसातच जाहिर केला जाणार आहे. किराणा दुकानांवर निर्बंध लावल्यामुळे नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. तसेच, वेळेचे बंधन असले तर सर्व जण त्याचे योग्य नियोजन करतील. शिवाय कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ही साखळी तुटताना दिसत नाहीय. राज्यात दिवसाला ६० हजारापेक्षा नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. म्हणूनच राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे.