मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. श्री. चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. श्री.मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला आहे. मूळचे लखनौ येथील श्री. श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. श्री. श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.
संजय पांडे मुंबईचे पोलिस आयुक्त
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्य सरकारने संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगराळे हे यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिस आयुक्त करण्यात आले. आता त्यांना सुरक्षा महामंडळावर पाठविण्यात आले आहे. माजी पोलिस आयुक्त आणि वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यानंतर नगराळे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती.