मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्य कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यात यासंबंधीचा इशारा देण्यात आला होता. अखेर राज्य सरकारने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, बंदिस्त ठिकाणी असलेल्या कार्यक्रमांमध्ये आता मास्क सक्तीचा असणार आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे कसोशीने पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली आहे. ही संख्या ४५००च्या वर गेली आहे. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले होते.
यांनी दिले पत्र
राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकारी आणि सर्व मनपा आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याच येत असल्याचे नमूद केले आहे.
येथे असेल सक्ती
या निर्णयानुसार आता बंदिस्त असलेल्या ठिकाणी मास्क सक्ती असेल. बंदिस्त ठिकाणी जिथे अधिक संख्येने नागरिक एकत्र येतात तेथे ही सक्ती असेल. जसे की बस, रेल्वे, लोकल, शाळा, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटल्स, नाट्यगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा त्यात समावेश आहे.
टास्क फोर्स बैठकीतील निर्णय असे
– कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पाहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
– कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
– लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
– ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्या
– गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा
– बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.
– ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी
– आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी
– ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.
– येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.