मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने राजकीय चक्र फिरवली तर महाराष्ट्राचे राज्यपाल या वर्षाअखेर पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. अर्थात यंदा राज्यपाल बदलण्यामागे कुठलेही वादग्रस्त कारण नसणार आहे. यापूर्वी भगतसिंग कोश्यारी यांना वादांमध्ये अडकल्यामुळे राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या बदलामागे दुसरे कारण असणार आहे.
कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. मुळात रमेश बैस हे छत्तीसगडमधील दुखावलेल्या भाजपवासींमध्ये गणले जात होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासह अनेक निष्ठावान भाजप नेत्यांना अनपेक्षितरित्या डावलल्यामुळे ते नाराज झाले होते. पण त्यानंतर निवृत्तीचे संकेत देण्यासाठी भाजपने त्यांच्या गळ्यात राज्यपालपदाची माळ घातली. त्रिपुरा, झारखंड आणि आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. पण आता छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे राज्यात परतण्याचे संकेत भाजपश्रेष्ठींकडून मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये नेतृत्वाचा अभाव म्हणून त्यांना परत बोलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राजकारणात परतणार?
राज्यपाल रमेश बैस गेल्या चार वर्षांपासून राजकारणापासून लांब आहेत. ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा खासदार होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले होते. पुढे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, या भूमिकेसह ते पुढे गेले. पण आता मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांच्यासह काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करू शकणारे नेतृत्व भाजपकडे नाही. त्याच कारणाने बैस यांची राजकारणात घरवापसी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाच वर्षांपासून पोकळी
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांना विश्रांती दिल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून राज्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे रमेश बैस यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगडमध्ये प्रमोट करण्याचा भाजपचा विचार सुरू असल्याचे कळते.
Maharashtra Governor Ramesh Bais BJP Politics