पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिक्षकांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात आले आहे. या निर्णयाची सध्या चर्चा असून त्याचा फटका अनेकांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना स्वप्रमाणपत्र भरता येणार आहे; मात्र वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना या शिक्षक भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही, असे उमेदवार भरती प्रक्रियेत निदर्शनास आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठीची सुविधा आहे, उमेदवार १५ सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र सादर करू शकतात.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ साठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. हे सर्व उमेदवार गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणार नसून त्यांनी स्वप्रमाणपत्र सादर करायचे आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे संबंधित उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
Maharashtra Government School Teacher Recruitment Rules