मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी राज्यभरात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येईल.
शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिनापासून सर्वसामान्यांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होईल. सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो. येणाऱ्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्याबरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच मुद्रांक व नोंदणी विभाग यांनी एकत्रितपणे नियोजन करुन गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर कसे कामकाज करावे याचे या सप्ताहात नियोजन असणार आहे.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम, 4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’, 5 ऑगस्ट रोजी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’, 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.
या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करुन मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रम, धोरणांना प्रसिद्धी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञांच्या मुलाखती तसचे व्याख्यानांचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करुन नागरिकांना देण्यात येतील.
महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. राज्यातील महसूल गोळा करण्याबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी या विभागावर असते. महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुधारीत नमुन्यातील 7/12 चे वितरण सुविधा, डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवहीची वितरण सुविधा, ई – मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्तनोंदणीशी संलग्न करणे या सुविधा आता देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या प्रश्नांची/अडचणींची सोडवणूक करण्याला प्राधान्य देण्यात येते. याशिवाय सलोखा योजना, सुधारित वाळू धोरण, महाराजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, ई पीक पाहणी, दस्तनोंदणीचे अद्ययावतीकरण असे अनेक निर्णय गेल्या वर्षभरात महसूल विभागने घेतले. विशेष म्हणजे या सर्व निर्णयांचा लाभ शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना होणार आहे.
महसूल विभाग प्रशासनाचा कणा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत महसूल या विभागाने महत्वाचे योगदान दिले आहे. यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात अग्रेसर राहील. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडीत असल्याने हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यांना सहज आणि जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करताना काही कायदे रद्दही करावे लागतात. नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.