मुंबई (इंडिा दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. आपण बंडखोरीच्या मूडमध्ये असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे अनेक आमदारही त्यांच्यासोबत आहेत. मात्र, हा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना सूरतच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एकनाथ यांच्याशी बोलण्यासाठी पाठवले होते, मात्र त्यांचे प्रयत्न फळाला आलेले दिसत नाहीत.
हिंदुत्व सोडून गेलेल्या शिवसेनेत परतणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे हे भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी युती वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्धव यांचे सरकार पडल्यास विरोधी पक्षात बसण्यास तयार असल्याचे सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंगाच्या ज्या सहा शक्यता आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.
१. भाजपतर्फे अविश्वास प्रस्ताव
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असल्यास ते नवा पक्ष स्थापन करू शकतात. दुसरीकडे, त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास विधानसभेत एनडीएचे १५० आमदार असतील. एनडीएला बहुमत मिळाले तर विधानसभेत अविश्वास ठराव आणून उद्धव सरकार पाडले जाऊ शकते.
२. तर पुन्हा निवडणुका
शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहात उद्धव सरकारच्या विरोधात मतदान केल्याचा निषेध नोंदवला तर सरकार पडू शकते. याशिवाय बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्यास पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. सध्याच्या सरकारचे भवितव्य त्याच्या पाठिंब्यावर असलेल्या आमदारांच्या संख्येवरून ठरणार आहे.
३. बंडखोर आमदारांचा राजीनामा
शिंदे यांच्यासमोर सध्या किमान ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान आहे. या आमदारांनी सभागृहाचा राजीनामा दिल्यास सभागृहातील संख्याबळ कमी होईल. यानंतर उरलेल्या आमदारांच्या संख्येवर सरकारची स्थिती अवलंबून असेल.
४. भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री
अपात्रता टाळण्यासाठी, शिंदे यांनी ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवून नवा पक्ष स्थापन केल्यास किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास, उद्धव सरकार पाडल्यानंतर भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू शकते.
५. शिंदे यांचा हेतू फसला तर
एकनाथ शिंदे ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत आणि त्यांना अपात्र ठरवले तर उद्धव सरकार टिकू शकते. कारण अशा स्थितीत अनेक आमदार पुन्हा शिवसेनेत जातील आणि महाविकास आघाडीचे सरकार राजकीय संकटातून वाचेल.
६. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास
महाराष्ट्रात काही काळ असेच राजकीय संकट आणि अनिश्चितता कायम राहिल्यास राज्यपाल याबाबत केंद्राला कळवू शकतात. यानंतर केंद्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकते.
maharashtra government politics 6 possibilities near future