मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याचा भाव पडला आहे. राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला भाव नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कांदा उत्पादकांना लवकरच भरघोस मदत देण्याची घोषणा केली आहे.
राज्यात कांदा प्रश्नावरुन वातावरण चांगलच तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तसेच विविध ठिकाणचे शेतकरीही आक्रमक झाले आहेत. अशातच आता यावर राज्य सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. अमरावती येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले,‘कधी मंदी कधी चांगला दर, असे घडत असते. भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे आतापर्यंत २८ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. अजूनही कांद्याची खरेदी करू. सहा महिन्यात या सरकारने जे शेतकऱ्यांना पैसे दिले ते याआधी कोणत्याही सरकारने दिले नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात आली. उरलेले २८ हजार शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील. शेतकऱ्यांना खूप मदत आम्ही करणार आहोत. फक्त घोषणा बाहेर करता येत नाही. लवकरच शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.’
उपमुख्यमंत्र्यांचेही आश्वासन
काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले होते. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे.
Maharashtra Government Onion Producer Farmer Help