रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल व त्यांच्या मुलाच्या कायमस्वरुपी नोकरीची जबाबदारी घेतली जाईल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.
आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी मंत्री श्री. सामंत यांच्याकडे पुन्हा केली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री श्री. सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख अशी मदत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी देण्याची जबाबदारीही श्री. सामंत यांनी स्वीकारली आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1623686290649796608?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
Maharashtra Government on Journalist Shashikant Warise Family