पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे यंदा शाळा, विद्यार्थी, पालक आणि पुस्तक विक्रेते हे सारेच हैराण होणार आहेत. कारण, राज्य सरकारने नव्या पुस्तकांची घोषणा केली खरी पण, यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके असणार आहेत. त्यामुळे मोठाच गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नामी युक्ती शोधत नव्या पाठ्यपुस्तकांची घोषणा केली आहे. त्यामुळेच सर्व विषयांची वेगवेगळी पुस्तके देण्यापेक्षा एकत्रित पुस्तके देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच, वह्यांची पाने सुद्धा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे आता एकाच पुस्तकात सर्व विषय आणि त्यात वह्यांची पाने असे पुस्तकाचे स्वरुप आहे. या नव्या पुस्तकांमुळे दर तीन महिन्याला एक पुस्तक विद्यार्थ्यांना बाळगावे लागेल. म्हणजेच, शैक्षणिक वर्षात एकूण ४ पुस्तके (दर ३ महिन्याला एक याप्रमाणे) घ्यावी लागतील.
नव्या पुस्तकांच्या घोषणेनंतर तशी छापण्यात आली आहेत. मात्र, सर्वांनाच नवी पुस्तके उपलब्ध होतील की नाही याची साशंकता असल्याने नवी आणि जुनी अशी दोन्ही पुस्तके उपलब्ध करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता नवीन एकात्मिक पाठ्यपुस्तके ५ जून पासून विक्रीसाठी खुली केली जाणार आहेत. तसेच नवीन एकात्मिक पाठ्यपुस्तके विक्रीसाठी खुली केल्यानंतर नियमित व एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत विद्यार्थी/पालक/शिक्षक/शाळा इत्यादींसाठी तयार करण्यात आलेल्या सूचनापत्रिकेचेही वाटप ५ जूनपासून केले जाणार आहे.
नव्या आणि जुन्या पाठ्यपुस्तकांमुळे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्वांचाच गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनी जर नव्या पुस्तकांचाच आग्रह धरला तर काय करायचे असाही प्रश्न निर्माण होणार आहे.
Maharashtra Government New Old School Text Book