मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी योजना जाहीर झाली तरीही लागू होणे आणि त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक असते. विशेषतः केंद्र सरकारची योजना म्हटल्यावर देशभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणीच असंख्य असतात. मात्र शेतकऱ्यांसाठी असलेल्या नमो सन्मान योजनेतील अडथळे आता दूर झाले असून महाराष्ट्राला त्याचा लवकरच लाभ मिळणार आहे.
या योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला १२००० रुपये जाणार आहेत. यात ६ हजार रुपये केंद्र सरकार व ६ हजार रुपये राज्य सरकार टाकणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करायचे होते. राज्यातून ८९ लाख ह८७ हजार शेतकऱ्यांनी या योजनेतील लाभ मिळावा म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज अचूक व पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांत या योजनेतील पहिला हफ्ता म्हणजे प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार आहेत.
राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १७१२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता कृषी विभागाला राज्यातील ५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करून घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या १५व्या हप्त्यावेळी ज्यांची ई-केवायसी नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचवेळी राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता वितरीत होणार आहे.
पीकविम्यातील २५ टक्के
एकीकडे राज्यात कोकण व नागपूर वगळता इतर २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच शेतकरी आत्महत्या देखील होतच आहेत. यंदा खरीप हंगाम वाया गेल्याने आता शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळणार आहे. त्यासाठी सरकारला विमा कंपन्यांना १५५१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तत्पूर्वी, शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर कमी करण्यासाठी नमो सन्मान योजनेचा हफ्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Government Ganeshotsav Farmer Good News