मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सात हजार 34 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असणार आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील गट ‘क’ च्या भरती अनुषंगाने सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री.पाटील बोलत होते.
मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, राज्य शासकीय कार्यालयातील गट- ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामधील प्रथम टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित गट-‘ब’ व गट-‘क’ संवर्गातील एकूण ८ हजार १६९ पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ८ हजार १६९ पदांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गाची ७ हजार ३४ पदे अंतर्भूत आहेत. प्रस्तूत जाहिरातीस अनुसरुन एकूण ४ लाख ६६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकूण २८१ नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत.
उमेदवारांना अर्ज सादर करतांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील उमेदवारांनासुद्धा त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या पसंतीच्या कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या तरतुदीमुळे कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.
Maharashtra Government Clerk Recruitment Preference