मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रौढ वाङ्मय अनुवादित या प्रकारातील ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात येत असून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी गठित केलेली परीक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.
राज्य शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात.
सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निर्णयानुसार स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ दि.६.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले होते.
Maharashtra Government Book Literature Award