मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील खो-खो, कबड्डी, कुस्ती, तसेच व्हॉलीबॉल या खेळांच्या खेळाडूंना राज्य स्पर्धा मध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पूर्वी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 50 लाखांवरून थेट 75 लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, क्रीडा स्पर्धा आयोजन निधीतून खेळाडू, पंच तसेच तांत्रिक पदाधिकाऱ्यांचा भोजन, निवास, प्रवास खर्च, रोख रकमेची बक्षिसे आदी बाबीवरील अत्यावश्यक असणारा खर्च भागविण्यासाठी या वाढीव निधीची मदत होणार आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात राज्यस्तरीय खेळांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा, कै. भाई नेरूरकर करंडक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलं जाते या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मातीतील प्रमुख देशी खेळाबद्दल ग्रामीण तसेच शहरी भागातील विशेष आवड तसेच आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने स्पर्धांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.
प्रमुख चार खेळ प्रकारांमधील क्रीडा स्पर्धा अनुदानात 25 लाख रुपये एवढी वाढ केल्यामुळे खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी मदत होईल. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडू निश्चितपणाने चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Government 4 Sports Tournament 75 Lakh Fund