मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण 186 धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही पदे धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत.
धर्मादाय रुग्णालये योजनेची अंमलबजावणी करीत असतांना सद्यस्थितीत संबंधित धर्मादाय रुग्णालयांमार्फतच वैद्यकीय समाजसेवकाची नेमणूक करण्यात येत होती. हा समाजसेवक रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामार्फत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची उचित माहिती न मिळणे, अनावश्यक कागदपत्रे मागणे, योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना, ऑनलाईन प्रणाली, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पालाईनसह आरोग्य सेवकांची पदभरतीची सुधारणा केली आहे.
आरोग्य सेवकांच्या पदभरतीमुळे धर्मादाय रुग्णालये अधिकाधिक लोकाभिमुख होतील. रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची योग्य माहिती, त्यांच्यावर केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे उपचार करण्यात येतील. खऱ्या गोर-गरीब गरजू रुग्णांना योजनेनुसार उपचार मिळणे सुलभ होईल. धर्मादाय रुग्णालयाकडून रिक्त खाटांची वेळोवेळी अद्यावत माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येत आहे किंवा कसे याबाबत धर्मादाय आरोग्य सेवक यावर लक्ष ठेवतील. योजनेची अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनच कक्षाच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 पर्यंत 418 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन घेण्यात आला. यासाठी 13 कोटी 25 लाख रुपये रकमेचे उपचार रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12,000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, बाई जेरबाई वाडीया, डॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटल, ब्रीट कॅण्डी हॉस्पीटल, दि बॉम्बे हॉस्पीटल, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, डी.वाय.पाटील हॉस्पीटल, के.ई.एम. हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, संचेती हॉस्पीटल, जहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयांचाही समावेश आहे
नागरिकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची संपूर्ण माहिती 24×7 उपलब्ध होणार आहे.
तसेच https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट दिल्यावर धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या आदी माहिती मिळणार आहे, असे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.