पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘जी-२०’ डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे जी-२० प्रतिनिधींसाठीं महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि आसीसीआरच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या लोकनृत्याचा निखळ आनंद लुटला. लावणी आणि गोविंदा नृत्य सर्वाधिक आवडल्याची प्रतिक्रियाही त्यांनी उत्स्फुर्तपणे दिली.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव अल्पेश कुमार शर्मा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री श्री.पाटील यांनी जी-२० प्रतिनिधींचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. जिजाऊ वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर विविध लोककला प्रकारांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. गोंधळी नृत्य, गोविंदा नृत्य, धनगर नृत्य, ओवी असे विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील लोकसंस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने पाहुण्यांना घडले. विविध रंगी पारंपरिक पोषाखातली कला मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह पाहुण्यांना आवरला नाही. गोविंदा नृत्यात एकमेकांच्या खांद्यावर उभ्या राहणाऱ्या गोविंदांना त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
कार्यक्रमाच्या मध्यावर भक्तीरसाचा अविष्कारही होता, वीर रसातील पोवाडा आणि सोबत हातात तलवार घेतलेल्या मावळ्यांच्या दृष्यालाही प्रतिसाद मिळाला. शिवराज्याभिषेकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रात अनेकदा येऊनही प्रत्येक वेळा लोकसंस्कृतीचा नवा अविष्कार पहायला मिळतो अशी प्रतिक्रीया सचिव अल्पेश कुमार यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केली.
Maharashtra Folk Dance G20 Guest