नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासावरुन लक्ष विचलीत झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यानंतरच्या परीक्षांवर झाला होता. विशेषत: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षांपूर्वी अतिशय कमी निकाल लागला होता. या विद्यार्थ्यांना संबंधित विषय महाविद्यालयांमध्ये शिकवण्यातच न आल्याने अनुत्तीर्ण विषय अजूनही त्यांना कठीण जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण मात्र दुसर्या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सवलत देण्याची मागणी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला. या अनुषंगाने मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध करीत पदविकेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑनचा लाभ घेता येईल असा निर्णय जाहीर केला आहे.
फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला आहे. त्या विद्यार्थ्यांनी दुसर्या वर्षातील अभ्यासक्रम नियमित उपस्थित राहून पूर्ण केला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरे वर्ष सोपे गेले. मात्र, पहिल्या वर्षाचा बॅकलॉग अजूनही भरून निघाला नसलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्यांना नैराश्याने ग्रासले आहे.
दुसरीकडे स्वायत्त महाविद्यालयांनी प्रथम वर्षात बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना तिस-या वर्षात प्रवेश दिला आहे. हाच न्याय तंत्रशिक्षण संचानलयाशी संलग्न पॉलिटेक्निक महाविद्यालयांनाही मिळावा अशी मागणी आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे दिली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या निर्णयाचा सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा देऊ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. आमदार फरांदे यांच्या निवेदनाची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याची परिणीती म्हणजे मंडळाने परिपत्रक काढत कॅरीऑनला मान्यता दिली आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, मंडळाच्या परीक्षा नियमावलीनुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील उन्हाळी परीक्षा २०२३ च्या निकालानंतर पुढील वर्षात प्रवेशाकरीता अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करिता पुढील वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यास विद्यार्थी हितास्तव अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून एक वेळ संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे. या पाठपुराव्याबद्दल आमदार फरांदे यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.
या आहेत अटी- शर्थी
१. ज्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२३ करीता दुसरे व चौथे सत्र मंडळाच्या परीक्षा नियम RG-6 नुसार पूर्ण केले आहे असे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकवेळ संधीचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
२. सदरची एक वेळ संधी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सत्रकर्म पूर्ण करून घेण्यासाठीच आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील तिसरे व पाचवे सत्र जे विद्यार्थी मंडळाच्या परीक्षा नियम RG-6 नुसार पूर्ण करतील त्यांनाच अनुक्रमे चौथ्या व सहाव्या सत्रात प्रवेश देण्यात येऊन सत्रकर्म पूर्ण करून घेण्याची संधी द्यावी.
३. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील तिसर्या व पाचव्या सत्रात सत्रकर्म पूर्ण न केल्यामुळे जे विद्यार्थी थोपवले जातील (Detained / Disallowed) त्यांनी संधी गमावली आहे, असे समजण्यात यावे व त्यांना अनुक्रमे चौथ्या व सहाव्या सत्रात प्रवेश देऊ नये.
४. हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये मागील सत्र/वर्षाच्या अनुत्तीर्ण विषयांत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील व मंडळाच्या परीक्षा नियमावलीनुसार पुढील सत्र / वर्षाकरिता प्रवेशास पात्र होतील त्यांना उन्हाळी परीक्षा २०२४ पासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील तिसर्या व चौथ्या / पाचव्या व सहाव्या सत्राची परीक्षा देण्यास पात्र राहतील.
५. उन्हाळी परीक्षा २०२३ दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गैरप्रकार प्रकरणी ( १ + १ ) शिक्षा झालेली आहे, असे विद्यार्थी सदर एक वेळ संधीकरीता अपात्र राहतील.
६. एक वेळ संधीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या Login मध्ये उपलब्ध केली जाईल. एक वेळ संधी घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे संस्थेने मंडळाच्या Online प्रणालीद्वारे Registration करणे बंधनकारक राहिल. तसेच
मंडळाच्या विभागीय कार्यालयाने Registration निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांनाच एक वेळ संधी देण्यात येईल. याबाबतचे सविस्तर परिपत्रक स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.
७. एक वेळ संधी केवळ सत्रकर्म पूर्ण करून घेण्यासाठीच असल्याने अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यार्थी परिक्षेस बसण्यास पात्र होईपर्यंत भरून घेण्यात येऊ नये याबाबत योग्य ती दक्षता घेणेची जबाबदारी संस्थेची राहील. अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेऊन त्यांना परीक्षेत बसविल्याचे निदर्शनास आल्यास अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
८. एक वेळ संधीमुळे एका विशिष्ट वर्गात विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास नियमित तसेच सदर संधी प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता संस्थेने वेगळा वर्ग तयार करुन शैक्षणिक कामकाज पूर्ण करावे.
९. एक वेळ संधी मिळणार्या विद्यार्थ्यांचे सत्रकर्म पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संस्थेची राहील. या विद्यार्थ्यांचे
अर्ज अभिलेखे (Record) ठेवणेची जबाबदारी संस्थेची आहे. तसेच असे रेकॉर्ड आवश्यकतेनुसार सादर केले जाईल असे हमीपत्र संस्थेने देणे आवश्यक आहे.
१०. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र पूर्ण केलेले आहे त्यांनी संबंधीत विषयाचे Termwork/Journal /Drawing/Assignments जतन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. परीक्षेत पात्र झाल्यावर Oral/Practical परीक्षेचे वेळी सदर Termwork/Journal /Drawing/ Assignments सादर करणेची जबाबदारी सदर विद्यार्थ्याची राहील.
११. प्रथम व द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन प्रक्रीया राबवली जाईल.
Engineering students will also get the benefit of carry on
Maharashtra engineering Diploma Students Exam Order
Education Technical Higher MLA Devyani Pharande Nashik