मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे. म्हणजेच पावसाळा सुरू असताना पावसाचा कुठेही मागमूस दिसत नाही. राज्यात जणू काही उन्हाळा जाणवत आहे. साहजिकच घरोघरी पंखे, कुलर, एसी आणि इतर उपकरणांचा वापर वाढला आहे. वास्तविक ऑक्टोबर हिट हा महिना यायचा बाकी आहे. असे असताना राज्यात लोडशेडिंग तथा भारनियमनाची मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठी चिंतन निर्माण झाली आहे. राज्यात सध्या अघोषित लोडशेडिंग सुरू झाले आहे. त्याचा त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच, पावसाने दडी मारल्यास लोडशेडिंगमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सणासुदीतच परीक्षा
ऑगस्ट महिन्याच्या सरासरीत यंदा पावसाने अत्यंत निराशा केली आहे. त्यामुळे नदी, नाले कोरडे पडले असून धरणातही पुरेसा पाणीसाठा नाही. अनेक मोठ्या धरणावरील वीजनिर्मिती संच बंद ठेवावे लागले आहेत. तर काही ठिकाणी वीज निर्मिती संच सुरू आहेत. तर दुसरीकडे विजेची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विजेचे भारनियमन करावे लागणार आहे. सध्या गौरी गणपती सारख्या सणासुदीचे दिवस असल्याने विजेची मागणी आणखीनच वाढणार त्यामुळे राज्यापुढे विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला आहे. यामुळे वीजेची निर्मिती व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण आहे. परिणामी, राज्यावर आपत्कालीन लोडशेडिंग म्हणजे भारनियमन करण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागाला मोठा फटका
लोडशेडिंग म्हणजेच भारनियमन हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ऐन उन्हाळ्यात वीज नसणे यासारखा त्रास नाही. परंतु सध्या तर पावसाळा सुरू असूनही वीज भारनियमनाची चर्चा सुरू आहे. पुण्या-मुंबईसारखे शहरं लोड शेडिंगमधून आधीच वगळली जातात परंतु ग्रामीण भागात मात्र याचा मोठा फटका बसतो तालुका आणि अन्य लहान शहरांमध्ये देखील विजेचे भारनियमन नेहमी होत असते.महाराष्ट्रात कोराडी, नाशिक, भुसावळ, पारस, परळी, खापरखेडा, चंद्रपूर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर कोयनेला मोठे जलविद्युत केंद्र आहे. परंतु अनेक ठिकाणी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने जलविद्युत प्रकल्प बंद आहेत. वास्तविक महाजनको सुमारे १५ हजार मेगावॅट इतक्या क्षमतेची वीज निर्मिती करू शकते. महाराष्ट्रात औष्णिक विद्युत, जलविद्युत प्रकल्पांतून वीज मिळते. त्यातील ७५ टक्के वीज औष्णिक विद्युत प्रकल्पातून मिळते.
इतके तास लोडशेडिंग होणार
वायूचा वापर करून वीजनिर्मिती करणारा एक प्रकल्प उरणला आहे. तसेच सौर उर्जा वापरूनही महाराष्ट्रात विजेची निर्मिती केली जाते.महाराष्ट्र वीजनिर्मितीसाठी कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. गेल्या गेल्या वर्षी काही काळात कोळशाची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होती. सध्याही पुन्हा काहीशी तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना दररोज अर्धा ते २ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे. यंदा राज्यात कमी पाऊस झाल्यामुळे वीजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी होणारा पाण्याचा उपसा वाढला आहे. परिणामी वीजेची मागणी वाढून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.
वीज मागणीत वाढ
महाजेनकोने कमी पावसामुळे औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभालीसाठी बंद ठेवली आहेत. यामुळे वीजेची मागणी व पुरवठ्यात तब्बल २ते ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने या समस्येचा निपटारा करण्यासाठी काही फिडरवर अचानक लोडशेडिंग सुरू केले. सद्यस्थितीत वीजेची कमाल मागणी २६ हजार मेगावॅटपेक्षा जास्त वाढली आहे. सामान्यतः ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे कृषी क्षेत्रातील विजेची मागणी कमी होते. पण यंदा ही मागणी कमी झाली नाही.
Maharashtra Electricity Load Shading Rainfall Drought Energy