मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रात भारनियमन अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे. वीज मंडळाचे खासगीकरण होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट करुनही कामगारांनी संप मागे घेतलेला नाही. तसेच, त्यातच ऊर्जामंत्र्यांसोबत संपकरी कामगारांची आज होणारी बैठकही रद्द झाली आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी राज्यात भारनियमन होण्याची दाट चिन्हे आहेत.
राज्यातील वीज निर्मिती केंद्रांचे काम कर्मचाऱ्यांअभावी प्रभावित झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वप्रथम भारनियम सुरू करण्यात आले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर टप्प्याटप्प्याने भारनियमन वाढविण्यात येणार आहे. वीज निर्मितीच होत नसल्याने तिचा पुरवठा करणे अशक्य आहे. संपकरी कर्मचारी जोवर कामावर रुजू होत नाही तोवर वीज निर्मिती होणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बँकेसह विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली. या बंदसोबतच वीज निर्मिती करणाऱ्या कामगारांनीही संपात उडी घेतली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये यासाठी राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू करण्याचा इशारा दिला. तर, दुसरीकडे वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा साठा पुरेसा नसल्याचे निदर्शनास येत आहे. कोळशाचा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड येथील कामगार संघटनाही संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे कोळशाचे उत्खनन करण्यापासून ते त्याची वाहतूक करणाऱ्या सर्वच कामगार संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील विविध वीज निर्मिती केंद्रांवर केवळ २ ते ३ दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. दोन दिवसाच्या संपानंतरही तातडीने कोळसा मिळाला नाही तर वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हामुळे वीजेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत राज्यात भारनियमन होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अन्यय पर्यायांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याला यश आलेले नाही.
आजची बैठक रद्द
राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी आज (२९ मार्च) दुपारी 2 वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात येईल. प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले. मात्र, आजची ही बैठक रद्द झाली आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या 27 वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो. उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला हजर रहावे आणि संप मागे घ्यावा, असे आवाहन डॉ.राऊत यांनी केले होते. ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्यास तयारी दर्शविली. मात्र, आजची ही बैठक अचानक रद्द झाली आहे. त्याचे कारणही समजू शकलेले नाही. त्यामुळे मात्र, वीज निर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून भारनियमन आता अटळ असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.