पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील शाळांमध्ये आता आजी-आजोबा दिवससाजरा केला जाणार आहे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांच्या प्रेमापासून नातवंड दुरावली आहेत. आता मात्र किमान वर्षातून एकदा विद्यार्थ्यांना आजी- आजोबांची माया अनुभवता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने आबा- आजी देखील विद्यार्थ्यांसोबत रमताना दिसतील. यासंदर्भात शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.
भारतीय कुटुंबव्यवस्थेत आजी- आजोबाच जीवनातील पहिले मित्र –मैत्रीण असतात. खेळतानाच त्यांच्याकडून नकळत संस्कारही पेरले जातात. मात्र आधुनिक काळात नोकरीच्या निमित्ताने कुटुंब विभक्त झाल्याने मुलं या प्रेमाला मुकली आहेत. अशास्थितीत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यंदा 10 सप्टेंबरला हा दिवस आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात यावा, अशी सरकारची सूचना आहे. पण, प्रस्तावित दिवशी आयोजन शाळेला करता येऊ शकले नाही तर शाळांनी आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी आजोबा’ दिवस म्हणून साजरा करावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
कार्यक्रमांची रेलचेल
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रथम विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचा परिचय करुन द्यायचा. मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ होतील. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबांना बोलवावे. विद्यार्थ्यांनी यावेळी कलाकृती सादर कराव्यात. आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.
Maharashtra Education Department School Day Celebration