मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनी बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनी बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.
यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डिजिटल सिस्टीम सुरक्षितता आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
Maharashtra Economical Literacy Cyber Security